उंब्रजचे वाहतूक पोलीस झाले ‘मी. इंडिया’....!

Wed 15th Oct 2025 09:03 am
गर्दीच्या ठिकाणी गायब, आडवाटेवर हजेरी; कॉलेज रोडवरील अघटितानंतर नागरिकांचा संताप

उंब्रज / अनिल कदम


उंब्रज पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागाचे कर्मचारी सध्या अक्षरशः “मिस्टर इंडिया”च्या भूमिकेत दिसत आहेत — म्हणजेच अदृश्य! वर्दळीच्या ठिकाणी ते कुठेच नजरेस पडत नाहीत, पण आडवाटेवर मात्र त्यांच्या “हजेरी”चे दर्शन घडते. अनिल कपूरच्या प्रसिद्ध चित्रपटातील पात्रासारखे हे पोलिसही नेमके कुठे असतात, हा प्रश्न उंब्रजकर नागरिकांना पडू लागला आहे.


गेल्या काही दिवसांपासून कॉलेज रोडवर वाहतूक कोंडी, शाळा सुटण्याच्या वेळी निर्माण होणारी गोंधळाची परिस्थिती, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात — याबाबत ‘विजयी मैदान’ या वृत्तपत्राने सलग चार ते पाच वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. आणि अखेर मंगळवार (दि.१४ ऑक्टोबर) रोजी तीच भीती खरी ठरली — एका बेधुंद मद्यपी दुचाकीस्वाराने दहावीतील विद्यार्थ्याला जोराची धडक दिली आणि तो गंभीर जखमी झाला. काही दिवसांपूर्वीच एका सातवीतील मुलाने शाळकरी मुलीला ठोकरले होते. तो प्रसंग आपसात मिटवला गेला, पण पोलिस प्रशासन मात्र पुन्हा झोपेतच राहिले!


 वाहतूक पोलिसांचा ‘रामभरोसे’ कारभार


चाफळ फाटा, बाजारपेठ, महामार्ग सेवा रस्ता, कॉलेज रोड — या सर्व ठिकाणी दररोज कोंडीचा कहर असतो. तरीदेखील वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. वेळ गेल्यानंतर, गोंधळ उडाल्यावरच पोलीस ‘दिसतात’, तोवर सगळा खेळ संपलेला असतो.


नागरिकांना दैनंदिन प्रवासात मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांना तर या कोंडीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तरीदेखील पोलीस फक्त दाखव्यासाठी कधीतरी हजेरी लावतात, एवढेच!


 महामार्गावरील अव्यवस्था आणि खासगी बसचालकांचे ‘राज’


रात्रीच्या वेळेस महामार्गावर उभ्या राहणाऱ्या खासगी बसेस, तसेच चाफळ रोडवरील अव्यवस्थित उभ्या असणाऱ्या वडाप गाड्यांमुळे वाहतूक ठप्प होते. या गाड्यांना नेमके कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.


उंब्रज शहराच्या वाहतूक व्यवस्थेची शिस्त पूर्णपणे ढासळली आहे. “नियम तोडले तरी चालतात, कारण पोलीस तिथे नसतात,” असा मानसिकतेचा प्रभाव उंब्रजमध्ये वाढू लागला आहे.


 ‘पाटण रोड’वर झाडाखाली बैठक, उंब्रजमध्ये गायब!


सध्या उंब्रज पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले काही वाहतूक पोलीस “बोलण्यात पोपट, पण कामात शून्य” अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यांचा कल वाहतूक शिस्तीपेक्षा ‘वसुलीकडे’ अधिक असल्याची उघड चर्चा रंगली आहे.


पाटण रोडवरील एका ठरावीक ठिकाणी झाडाखाली दररोज त्यांची ‘बैठक’ भरते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. पण ज्या कॉलेज रोडवर विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येत आहेत, तिथे एकही पोलीस उभा राहात नाही!


 नागरिकांचा संताप — “वसुली करा, पण जबाबदारीही घ्या!”


“वसुली करायलाच हवी, पण त्यासोबत जबाबदारीही पार पाडा,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी कॉलेज रोडवर हजर राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे वाहनधारकांना शिस्त लागेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल.


पण सध्या परिस्थिती अशी आहे की, उंब्रजचे वाहतूक पोलीस म्हणजे ‘मी. इंडिया’ — कुठे आहेत, कोणाला माहीत नाही!



अपघाता समयी माणुसकी धावली


महात्मा गांधी विद्यालयाच्या गेट समोर गंभीर अपघात झाल्यावर शाळेतील दोन शिक्षिका आणि ग्रामस्थांनी जखमी विद्यार्थ्यांला सरकारी दवाखान्यात दाखल केले यावेळी समोर रुग्णवाहिका उभी असताना १०८ ला फोन करण्याची लगबग डॉक्टर करीत होते त्यावेळी काही युवकांनी १०८ कधी येणार त्यापेक्षा समोर उभी असणारी रुग्णवाहिका तातडीने विद्यार्थ्यांला घेऊन कराडला पाठवा असा सल्ला दिल्याने 

अपघाता समयी माणुसकी धावली असल्याचा अनुभव आला.