उंब्रजच्या लक्ष्मीनगरमध्ये मोबाईल स्टेटसवरून तुंबळ राडा
Tue 26th May 2026 08:20 pm
दोन गटांत दगडफेक, लोखंडी साहित्याने हल्ले; तिघेजण जखमी, वाहनांचे नुकसान
उंब्रज | प्रतिनिधी
कराड तालुक्यातील उंब्रज येथील लक्ष्मीनगर परिसरात मोबाईलवरील स्टेटसच्या किरकोळ कारणातून दोन गटांमध्ये झालेला वाद अचानक हिंसक वळण घेत तुंबळ हाणामारीत परिवर्तित झाला. दोन्ही बाजूंच्या ३० ते ४० जणांनी एकमेकांवर दगडफेक करत भंगारातील लोखंडी साहित्याने हल्ले चढवल्याने परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून एका छोटा हत्ती टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगरमधील गोसावी समाजातील दोन कुटुंबांतील लहान मुलांमध्ये मोबाईल स्टेटसच्या कारणावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला होता. मात्र, या वादात काही वेळातच दोन्ही कुटुंबांतील मोठी मंडळी सहभागी झाल्याने वातावरण तापले. शिवीगाळ, धक्काबुक्की यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. तसेच परिसरातील भंगारातील लोखंडी साहित्य हातात घेऊन परस्परांवर हल्ले करण्यात आले.
आरोग्य केंद्रामुळे जखमींना त्वरित मदत
ज्या ठिकाणी ही तुंबळ हाणामारी झाली, त्या परिसरालगतच उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया खंडागळे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तत्परतेने उपचार करून जखमींचा रक्तस्त्राव थांबवला. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कराड येथे पाठवण्यात आले आहे.
या हाणामारीत राहुल दिलीप चव्हाण (२४), पिंटू अंकुश चव्हाण (४३) आणि राजेश दिलीप आटोळे (४०) हे जखमी झाले. जखमींना तातडीने उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेदरम्यान सुमारे तासभर लक्ष्मीनगर परिसरात आरडाओरडा, दगडफेक आणि हाणामारी सुरू असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी उंब्रज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहोचत दोन्ही गटांना पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी गोसावी समाजातील नागरिकांची तातडीची बैठक घेत शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच पुन्हा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही दिला. घटनेनंतर उशिरापर्यंत लक्ष्मीनगर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.