उंब्रज परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरूच; नागरिकांचा संताप वाढला

Tue 26th May 2026 07:50 pm

उंब्रज परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरूच; नागरिकांचा संताप वाढला

उंब्रज / प्रतिनिधी :

कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात सध्या वीज वितरण व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तीव्र उकाड्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तांत्रिक बिघाडांची मालिका आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उंब्रज परिसरातील वीजपुरवठा अत्यंत अस्थिर झाला आहे. दिवसभरात अनेक वेळा वीज ये-जा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा कोणताही नेम नसल्याने विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, लघुउद्योग, व्यापारी, डॉक्टर, इंटरनेट सेवा देणारे व्यावसायिक तसेच शेतकरी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अचानक वीज खंडित होणे आणि काही क्षणांत पुन्हा सुरू होणे यामुळे घरगुती तसेच औद्योगिक उपकरणे जळण्याचे प्रकार वाढले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अनेकांनी महावितरणकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, महावितरणकडून राबविण्यात येत असलेला ‘स्मार्ट मीटर’ प्रकल्पही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रत्यक्ष वापरापेक्षा अधिक वीजबिल आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असून मीटरमधील तांत्रिक बिघाड आणि तक्रारींवर होणारी दिरंगाई यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

परिसरातील अनेक डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) सातत्याने बिघाडग्रस्त अवस्थेत असून विद्युत तारा झाडांच्या फांद्यांत अडकलेल्या व लोंबकळणाऱ्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी या तारा रस्त्याच्या पातळीपर्यंत खाली झुकल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. शिवारातील डीपींची नियमित देखभाल होत नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक वीज वेळेवर मिळत नसून त्याचा थेट परिणाम पिकांवर होत आहे.

वादळी वाऱ्याच्या काळात झाडांच्या फांद्या तारांवर पडण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाही महावितरणकडून कोणतीही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. शालेय परीक्षा, ऑनलाईन शिक्षण तसेच घरातून काम करणाऱ्या नागरिकांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे.

नवीन वीज जोडणीसाठी नागरिकांना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत असून वारंवार कार्यालयीन फेऱ्या मारूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर उंब्रज परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे.