उंब्रज/प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील कळंबे येथील गायरान जमीन अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला वीज निर्मिती प्रकल्पासाठी देण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र मागणीची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी कळंबे येथील बंधाऱ्याजवळ आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान काही काळ प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दि. १७ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये मौजे कळंबे येथील तब्बल २८.६९ हेक्टर गायरान क्षेत्र अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या खासगी कंपनीला वीज निर्मिती प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. मात्र हा निर्णय घेताना ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गावकऱ्यांच्या स्पष्ट विरोधाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने कंपनीच्या बाजूने निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गावकऱ्यांच्या मते, संबंधित गायरान क्षेत्र हे केवळ मोकळी जमीन नसून गावातील गुरांच्या चराईसाठी, सामुदायिक वापरासाठी तसेच भविष्यातील ग्रामविकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात गायरान जमिनीचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व मोठे असते. अनेक शेतकरी व पशुपालक कुटुंबांची उपजीविका या क्षेत्रावर अवलंबून असल्याने गावाच्या हक्काची जमीन खासगी कंपनीला देणे हा गावाच्या अस्तित्वावर घाला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांनी संबंधित गायरान क्षेत्राचे बाजारमूल्य सुमारे २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा करत शासनाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ग्रामसभेचा ठराव, स्थानिक जनतेचा विरोध आणि गावकऱ्यांच्या भावना डावलून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय लोकशाही प्रक्रियेला हरताळ फासणारा आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयातील जगपालसिंग व इतर विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणाचा उल्लेख करत गायरान जमिनीच्या संरक्षणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला. महसूल व वन विभागाच्या विविध शासन निर्णयांचे पालन झाले नसल्याचे सांगत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम २२-अ चा भंग झाल्याचाही आरोप करण्यात आला. गायरान क्षेत्र हस्तांतरित करण्यापूर्वी ग्रामसभेची संमती घेणे आवश्यक असताना ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कळंबे, जळव आणि जांभेकरवाडी या गावांना गायरानच्या बदल्यात देण्यात आलेली जमीन वेगवेगळ्या ठिकाणी तुकड्यांमध्ये असल्याने त्याचा गायरान म्हणून कोणताही उपयोग होणार नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. या बदल्या संदर्भात ग्रामपंचायतींना किंवा स्थानिक नागरिकांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कळंबे महसुली हद्दीतच दुप्पट गायरान क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. गुरांच्या चराईसाठी, भविष्यातील शासकीय व निमशासकीय प्रकल्पांसाठी तसेच ग्रामस्थांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी गावाच्या हद्दीत पर्यायी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधातही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. “पालकमंत्री हत्ती सारखे फक्त कान हलवतात, पण आमच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही,” अशा शब्दांत आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. या घोषणांमुळे आंदोलनस्थळी काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की, “सदर आदेश तात्काळ रद्द करून अदानी कंपनीचे काम बंद करण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या काळात कळंबे येथील बंधाऱ्यात आत्मदहन अथवा जलसमाधी घेण्यास आम्ही मजबूर होऊ.” ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाटण तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वातावरण तापले असून आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंधाऱ्यात अदानी कंपनीचे कथित अनधिकृत काम सुरू?
कळंबे हद्दीतील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या छोट्या बंधाऱ्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता काम सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कामासाठी प्रशासनाची मंजुरी घेण्यात आलेली नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असून बंधाऱ्याच्या परिसरातील माती व दगड उपसा सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अनधिकृत काम बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कळंबे तलावात आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या मध्यस्थीने टळला अनर्थ
गायरान जमीन हस्तांतरणाच्या निर्णयाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असताना काही संतप्त ग्रामस्थांनी कळंबे तलावात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. प्रशासन आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेत आंदोलन शांततेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.