चरेगावातील मंदिर तोडफोड प्रकरणाचा उलगडा; आरोपी मनोरुग्ण, जातीय संबंध नसल्याचे स्पष्ट
उंब्रज / प्रतिनिधी
चरेगाव (ता. कराड) येथील श्रीराम मंदिरात देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी जलदगतीने उलगडा केला असून ओमकार विलास शिलेवंत (वय २३, रा. चरेगाव) हा आरोपी निष्पन्न झाला आहे. संबंधित आरोपी मानसिक आजाराने ग्रस्त (मनोरुग्ण) असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.चरेगावच्या हद्दीत असलेल्या श्रीराम मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता माता, मारुती व स्थानिक देवतांच्या मूर्तींची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १४८/२०२६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम २९८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या घटनेचा कोणताही जातीय किंवा धार्मिक संबंध नाही. ही घटना एका मनोरुग्ण व्यक्तीकडून घडलेली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून तणाव निर्माण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, कराड तालुक्यातील नागरिकांनी, विशेषतः चरेगाव परिसरातील ग्रामस्थ व सामाजिक संघटनांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.