एसएससी परीक्षेत रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाचे दैदिप्यमान यश; ऐश्वर्या प्रजापती ९७ टक्क्यांसह प्रथम

Sun 24th May 2026 02:30 pm

उंब्रज, प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयातील सर्व १२७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून त्यापैकी तब्बल ७७ विद्यार्थिनींनी विशिष्ट प्राविण्य प्राप्त केले आहे.

विद्यालयातील कुमारी ऐश्वर्या अनोखेलाल प्रजापती हिने ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी अनुष्का भाऊसो पाटील हिने ९६.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर कुमारी समृद्धी संजय देशमाने हिने ९५.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. या तिन्ही विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्यासह विद्यालयाच्या यशात मानाचा वाटा उचलला.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुनीता रतन पाटील यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थिनींची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच हा उज्ज्वल निकाल शक्य झाला आहे.

यशस्वी विद्यार्थिनींचे प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील, वर्गशिक्षिका सौ. वनश्री श्रीकांत जिरंगे व सौ. कोमल लक्ष्मण शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, महिला तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती, माजी विद्यार्थिनी संघटना, ग्रामपंचायत उंब्रज तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या या शतप्रतिशत निकालाने उंब्रज परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थिनींच्या यशाने विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.