मराठमोळे जिल्हाधिकारी संतोष पाटील

Tue 7th Jan 2025 09:51 am
पाल यात्रा नियोजनाच्या अंतिम बैठकीत दिसली आपुलकी

अनिल कदम / उंब्रज 

 पालीचा खंडोबा म्हणजे जागृत देवस्थान अशी भावना लाखो भक्तांची आहे.आंध्र,कर्नाटक,महाराष्ट्र या ठिकाणचे भाविक प्रतिवर्षी यात्रेनिमित्त पाल ता.कराड येथे मोठ्या भक्तिभावाने येत असतात देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत पाल,कराड तालुका प्रशासन यांची मोठी कसरत आणि जबाबदारी पणाला लागलेली असते ११ जानेवारी रोजी होणाऱ्या यात्रा नियोजनाबाबत मुख्य दिवसांपूर्वी प्रशासनाच्या तीन ते चार बैठका होत असतात गेल्या पाच वर्षांपासून कराड तालुक्याचे प्रांताधिकारी यात्रा नियोजनाची जबाबदारी पार पाडत आले आहेत क्वचितच तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी याबाबत गंभीरपणे भूमिका घेतल्याचे जाणवले नसल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केले परंतु नुकताच जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेले नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दि.६ रोजी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत सुमारे पाच तास पाल येथे आढावा घेतला यामुळे मराठमोळे जिल्हाधिकारी ग्रामस्थांच्या 'गुड बुक' मध्ये सामील झाले. 


 जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा प्रशासनातील दांडगा अनुभव बैठकीच्या निमित्ताने ग्रामस्थांना अनुभवयास मिळाला प्रशासनातील प्रत्येक विभागाची असणारी इत्यंभूत माहिती आणि 'खटक्यावर बोट जाग्यावर पलटी'करण्याचा स्वभाव यामुळे निश्चितच पाल तसेच जिल्ह्यातील इतर विभागांचे कार्य सुधारण्यास मदत होणार आहे.प्रशासनातील प्रमुख पदावर जिव्हाळा व आपुलकी असणारी व्यक्ती असेल तर अनेक धोरणात्मक निर्णय होत असताना समाजहित लक्षात घेतले जाते यामुळे श्वेता सिंगल,शेखर सिंह,जितेंद्र दुडी यांच्यानंतर जिल्ह्याची कमान मराठमोळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे आली आहे. 

 खंडोबा नगरी पाल ता.कराड परिसराचे नंदनवन होण्यासाठी खमकी भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व जिल्ह्याच्या प्रशासनात असल्याने बसस्थानक,भक्त निवास तसेच इतर सोयी सुविधा निर्माण करताना झुकते माप राहणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले,पर्यटन मंत्री ना.शंभूराज देसाई,ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील या जिल्ह्यातील चार कॅबिनेट मंत्र्यांच्या माध्यमातून विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे तसेच पाल देवस्थान प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना परिसराचा विकास करण्याची मोठी संधी चालून आली आहे.कोणताही गट तट तसेच पक्ष न पाहता भाविकांसाठी जे काही चांगले करता येणार आहे यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.