नोंदणीकृत वर्तमान पत्रातील सर्व पत्रकारांना एसटी प्रवास सवलत द्या
उंब्रज / प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम उत्पादने काटकसर करून वापरा देश हितासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा असा संदेश दिला असल्याने त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यातील नोंदणीकृत दैनिकांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना एसटी प्रवासात सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत सकारात्मक विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांना बळकट केले पाहिजे आज अनेक पत्रकार बांधव बातमीच्या निमित्ताने प्रवास करीत असतात परंतु ठराविक पत्रकार बांधवांना सवलत मिळते तर ती सरसकट मिळाल्यास डिझेल पेट्रोलचा वापर कमी होऊन देशसेवेची संधी मिळणार आहे.
सध्या शासनाकडून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच काही प्रमाणात सुविधा दिल्या जातात. मात्र ग्रामीण भागात, तालुका स्तरावर आणि दुर्गम भागात कार्यरत असलेल्या अनेक पत्रकारांकडे अधिस्वीकृती नसतानाही ते सातत्याने समाजातील प्रश्न मांडत असतात. अपघात, नैसर्गिक आपत्ती, आंदोलन, निवडणुका, शासकीय कार्यक्रम तसेच जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम हे पत्रकार करत असतात.
अशा परिस्थितीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नोंदणीकृत दैनिकांत काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना किमान एक वर्षासाठी तरी एसटी प्रवासात विशेष सवलत योजना लागू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील पत्रकारांना वारंवार तालुका, जिल्हा आणि मंत्रालय स्तरावर बातम्यांच्या अनुषंगाने प्रवास करावा लागतो. वाढते इंधन दर, प्रवास खर्च आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक पत्रकारांवर ताण निर्माण होत आहे. त्यामुळे पत्रकारांना एसटी प्रवास सवलत मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार असून पत्रकारितेचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी भावना पत्रकार संघटनांकडून व्यक्त होत आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.