उंब्रज, ता. कराड : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशाने सीएनजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वाहनचालकांसाठी स्वतंत्र रांग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. स्थानिक रिक्षाचालक, शाळा बस चालक आणि व्यावसायिक वाहनधारकांना याचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उंब्रज वराडे व शिवडे गावच्या हद्दीतील दोन्ही सीएनजी पंपावरही गेल्या काही दिवसांपासून बाहेरगावच्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. सीएनजी पुरवठ्यातील तुटवडा आणि महामार्गावरील वाढती वाहतूक यामुळे स्थानिक वाहनधारकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत सीएनजी पंपांवर लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक रिक्षाचालक, प्रवासी वाहतूकदार, शालेय वाहनचालक आणि छोट्या व्यावसायिक वाहनधारकांचे दैनंदिन उत्पन्न वाहनांच्या वेळेवर उपलब्धतेवर अवलंबून असते. मात्र, सीएनजी भरण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे खेडच्या धर्तीवर उंब्रज येथील दोन्ही सीएनजी पंपावरही स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र रांग किंवा निश्चित वेळ राखून ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक वाहनधारकांचे हित लक्षात घेऊन प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंपनीने तातडीने पुढाकार घेऊन उंब्रज येथेही स्वतंत्र व्यवस्था लागू करावी, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेतही सुसूत्रता येण्यास मदत होईल.