युद्धजन्य परिस्थितीचा फायदा; बोगस बुकिंगमधून लाखोंची उकळपट्टी
उंब्रज / प्रतिनिधी
देशभरात इंधनटंचाईची भीती आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा काही गॅस एजन्सींनी सर्रास गैरफायदा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बोगस बुकिंग करून लाखो रुपयांची वरकमाई केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.सदरचे घरगुती सिलेंडर बेकायदेशीर पणे बिनबोभाट व्यावसायिक सिलेंडर मध्ये पलटी मारले जात असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली असून पुरवठा विभागाला याबाबत कल्पना दिल्यास पुरावा द्या असे सल्ले दिले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक एजन्सींनी ग्राहकांच्या नावावर बनावट बुकिंग दाखवून सिलिंडर काळ्या बाजारात वळवले. या प्रकारात काही ठिकाणी एकाच ग्राहकाच्या नावावर बुकिंग दाखवून प्रत्यक्षात सिलिंडर वितरितच न केल्याचे आढळून आले आहे. मात्र कागदोपत्री वितरण दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला.
विशेष म्हणजे, युद्धजन्य तणावामुळे गॅस टंचाई निर्माण होईल या भीतीने अनेक नागरिकांनी आगाऊ बुकिंग केले. याच भीतीचा फायदा घेत काही एजन्सींनी कृत्रिम तुटवडा निर्माण करत सिलिंडरचा काळाबाजार तेजीत ठेवला. परिणामी सामान्य ग्राहकांना वेळेवर गॅस मिळणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी महिलांना स्वयंपाकासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक स्तरावर काही ग्राहकांनी या गैरप्रकारांविरोधात आवाज उठवला असून, पुरवठा विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही एजन्सी कर्मचारी आणि दलाल यांचा साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सामान्य नागरिकांच्या जीविताशी आणि दैनंदिन गरजांशी खेळणाऱ्या अशा प्रकारांवर प्रशासनाने तात्काळ लगाम घालणे गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
एजन्सी मालक वजनदार व्यक्तीमत्व
काही तक्रारदार आमचे नाव सांगू नका नाहीतर आम्हा गरिबांना दमदाटी होईल अशी विनवणी करीत असून हॉटेलचा सिलेंडर पलटी मारून 3000 रुपयांना काळ्या बाजारात विकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.गोर गरीब नागरिक दिवसाचा मोलमजुरीचा खडा करून दिवसभर गॅसची वाट बघत बसत असून कमाईचा गोल्डन चान्स असल्याने पुरवठा करणारा रिक्षा चालक सुद्धा दमाची भाषा बोलू लागला आहे