काशिळ-पाली मार्गावर भीषण अपघात

Mon 25th May 2026 08:43 pm
रस्त्यावर पडलेल्या डांबराला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

काशिळ-पाली मार्गावर भीषण अपघात 

- रस्त्यावर पडलेल्या डांबराला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

उंब्रज/प्रतिनिधी

    काशिळ ते पाली मार्गावर शिरगाव हद्दीत रस्त्यावर पडलेल्या डांबराच्या ढिगाला दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली. शिवाजी पवार (वय ५०, रा. कोर्टी ता. कराड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

   ही घटना रविवारी (दि. २४) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पवार हे दुचाकीवरून काशीळ-पाली मार्गाने जात असताना शिरगाव गावच्या हद्दीत रस्त्यावर पडलेल्या डांबराच्या ढिगाला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, ते सुमारे २५ फूट दूर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा  मृत्यू झाला.



सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराचा डांबर प्लांट शिरगाव परिसरात सुरू आहे. या कामासाठी वापरले जाणारे डांबर वाहतूक करताना अथवा टाकताना काही प्रमाणात रस्त्यावर पडत असल्याचे नागरिकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.  रस्त्यावर पडलेले डांबर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, याच निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करुन संताप व्यक्त केला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच रस्त्यावर पडणारे डांबर, खडी व इतर साहित्य तात्काळ हटवून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही केली आहे.